अहमदनगर उत्तर

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे – विठ्ठलराव शेळके

Published by
Ahmednagarlive24 Office

गोदावरी उजवा तट कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडावे तसेच शेतीसाठीच्या पाणीपट्टीत केलेली १० पट वाढ रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व गोदावरी उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी उजवा तट कालव्याच्या उपअभियंत्यांना राहाता येथे दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे की, दारणा धरण समूहात जवळजवळ ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.

कालवा लाभक्षेत्रात यावर्षी जून महिन्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिके सोयाबीन, मका, कपाशी या पिकांची पेरणी केली आहे. शिवाय शेतात चारा पिके, फळबागा ऊस इत्यादी पिके उभी आहेत. जवळजवळ एक महिन्यापासून पाउस उघडला असल्याने शेतातील उभी पिके जळू लागली आहे.

तरी तातडीने खरीप हंगामाचे आवर्तन सोडून उभ्या पिकांना सात नंबर फॉर्मवर पाणी द्यावे, तसेच पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत दहापट वाढ केली आहे. सन २०१८-१९ यासाठी बारामाही पिकांसाठी पाणीपट्टी दर स्थानिक करासह ५३८ रुपये होते, नवीन दरवाढीप्रमाणे एकरी ५४४३ रुपये नवीन पाणीपट्टी दर असतील.

यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतमाल सोयाबीन, कांदा व इतर पिकाची निर्यात बंदी केल्यामुळे कोणत्याही शेतमालाला भाव नाही, त्यात पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत मोठी वाढ केल्याने पाटपाणी कसे घ्यावे? अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे.

नवीन पाणीपट्टी दर खरीप पिकासाठी १८९०रुपये आणि रब्बीसाठी ३६८० रुपये करण्यात आले आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात दुष्काळामुळे पिके जळून गेली आहेत तरी यावर्षी खरीप व रब्बी हंगामात किमान दोन दोन आवर्तने व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचे नियोजन करावे कालवा सल्लागार समितीची बैठक राहता पाटबंधारे विभागात घेऊन तीला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना निमंत्रित करावे.

अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकरी या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे पत्रकावर तालुकाध्यक्ष शंकरराव लहारे राजेंद्र गोर्डे, भाऊसाहेब एलम, दादासाहेब गाढवे, हौशीराम चोळके, पुंजाराम आहेर मीनानाथ पाचरणे, सावळेराम आहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ahmednagarlive24 Office