अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संगमनेर तालुक्यातील पठारभागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातच वाहनातील डिझेल चोरीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका ट्रक चालकाला पोलिसांनी शिवीगाळ करीत हुसकावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या सर्व घटनांचा निषेध म्हणून शनिवारी घारगावकरांनी बंद पाळून पोलिसांचा निषेध नोंदविला. अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून घारगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या पठारभागात चोरट्यांनी चोरीचे सत्रच सुरु केले आहे.
चोरट्यांनी घारगावला लक्ष्य केले असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकामागून एक चोरीच्या घटना घडत आहेत. त्यातच माहुलीनजीकच्या राजस्थान ढाब्यावर उभ्या असलेल्या परराज्यातील एका मालवाहतूक ट्रकमधील सुमारे दोनशे लिटर डिझेल चोरुन नेण्याची घटना घडली.
याबाबत संबंधित ट्रकचालक त्या ढाब्यावरुन डिझेल चोरीचे उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फूटेज घेवून मोठ्या अपेक्षेने घारगाव पोलीस ठाण्यात गेला.
त्याची तक्रार ऐकून व त्याच्याकडील सीसीटीव्हीचे फूटेज पाहून त्यात दिसणार्या चोरट्यांच्या वाहनाचा माघ काढण्याऐवजी पोलिसांनी ट्रकचालकालाच शिवीगाळ केली.
त्याची कोणतीही तक्रार न घेताच चक्क त्याला पोलीस ठाण्यातून अक्षरशः हुसकावून लावले. यावरुन घारगावमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला आहे.