अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- नव्याने बांधकाम झालेल्या कोपरगाव बसस्थानकास श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे.
अन्यथा आठ दिवसांनी नाव न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने नाव देईल, असा इशारा आमदार आशुतोष काळे, तहसीलदार विजय बोरुडे व आगारप्रमुखांना मंगळवारी (ता.23) दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कोपरगावच्या आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले आहे की, शहरात नव्याने झालेल्या बसस्थानकास श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी दोन महिन्यांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती.
त्यावेळी इमारतीचे काम पूर्णत्वास येत होते. परंतु, आता हे काम पूर्ण झाले असून, बसस्थानक देखील सुरू झाले आहे. तरी अजूनही या इमारतीस छत्रपतींचे नाव दिलेले नाही.
येत्या आठ दिवसांत जर कार्यवाही केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने नाव देईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष सतीष काकडे, तालुका संघटक रघुनाथ मोहिते,
उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, हिंदू सम्राट संस्थापक बापू काकडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, उपशहराध्यक्ष संजय जाधव, संघटक बंटी सपकाळ, युवा नेते नवनाथ मोहिते आदिंच्या सह्या आहेत.