अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले यांना एका अज्ञाताने व अनोळखी व्यक्तीने मोबाइल नंबरवरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले यांना खंडणीखोराने दोन कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले.
तसेच पोलिसांना कळवले तर त्रास होईल अशी धमकी देखील देण्यात आली. ही परिस्थिती लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे देखील पथकासह श्रीरामपूर शहरात हजर झाले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.