कोपरगाव

अहमदनगर जिल्ह्यातील मुलीने करून दाखवलं ! कुठलाही क्लास न लावता MPSC उत्तीर्ण

Published by
Ahmednagarlive24 Office

कोपरगाव येथील निलीमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीनी हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत कुठलाही क्लास न लावता अभ्यास करुन तिने वर्ग २ चे सरकारी पद प्राप्त केले.

तिने कठीण परीस्थितीत यश मिळवून सर्वांसमोर आदर्श ठेवला असल्याची माहिती येथील कर सल्लागार व तिचे मामा राजेंद्र काशिनाथ वरखडे यांनी दिली आहे.

पतीचे निधन झाल्यानंतर निलीमाची आई मिनाक्षी नानकर यांनी आपल्या तिन्ही लेकींना घेऊन थेट कोपरगाव माहेरी आल्या. येथील कर सल्लागार वरखेडे यांनी आपल्या बहिणीला आणि तिन्ही भाचींना मोठा आधार दिला. मात्र, आपण कुणावरही अवलंबून रहायचं नाही, असा ध्यास आई मिनाक्षी यांनी घेतला,

परिणामी, शिवणकाम आणि स्वयंपाकाची कामे करुन त्यांनी तिन्ही लेकींना शिक्षणासाठी उद्युक्त केले. असंख्य अडचणी आल्या पण नानकर कुटुंबियांनी हार मानली नाही. मोठी कन्या शुभांगी हिने एमकॉमचे शिक्षण घेतानाच अकाऊंटंट म्हणून नोकरी पत्करली. त्याचवेळी तिने महावितरण कंपनीची परीक्षा दिली. त्यात तिला यश आले.

द्वितीय कन्या हेमांगी हिने सुद्धा एम. कॉम, चे शिक्षण घेतले. तिनेही अकाऊंटटं म्हणून नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावला. त्यानंतर ती सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. आज ती पुण्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

या दोन्ही लेकींचे लग्न करण्यापासून सर्वच प्रकारची जबाबदारी मिनाक्षी यांनी पार पाडली. तर, धाकली कन्या निलीमा हिने एम.कॉम. चे शिक्षण घेतल्यानंतर एमपीएस्सीचा ध्यास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून तिने एमपीएस्सीच्या विविध परिक्षा दिल्या. आणि काल दुय्यम निबंधक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ती उत्तीर्ण झाली आहे.

तर निलिमा ही एम.कॉम. चे शिक्षण घेत होती. त्याचवेळी अकाऊंट विषय शिकविणारे प्रा. रविंद्र जाधव यांनी निलिमाला एमपीएस्सीच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तो निलिमाने गांभिर्याने घेतला. मात्र, त्याविषयी तिला काहीही माहित नव्हते.

अखेर तिने विविध पुस्तकांचे वाचन सुरू केले. त्यासाठी अभ्यासिका गाठली. विवाहित भगिनी शुभांगी आणि हेमांगी या दोघींनीही निलिमाच्या अभ्यासाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. अखेर निलिमाने थेट पुण्यातील हडपसर गाठले.

एमपीएससीचे कुठलेही क्लास न लावता हडपसरच्या महात्मा फुले अभ्यासिकेत सकाळी ७ ते रात्री ११ या वेळात प्रचंड अभ्यास केला. आणखी एका वाचनालयात ती रात्ररात्रभर अभ्यास करायची. याद्वारेच तिने एमपीएससीच्या विविध परीक्षा दिल्या.

यातील एका परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. मात्र, अन्य परीक्षांमध्येही उत्तम निकालाची तिला अपेक्षा आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: mpsc