दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप वाहून जाऊन नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी कारवाडी -हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५) नदीमध्ये गेले; मात्र पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये वाहून गेले असून पाण्याचा प्रवाह जास्त असून शोधकार्य सुरू असल्याचे तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष तांगतोडे, अमोल भिमाशंकर तांगतोडे (वय ३०), प्रदिप भिमाशंकर तांगतोडे (वय २८) व नारायण भिकाजी तांगतोडे (वय ५२) हे गोदावरी नदीच्या पात्राला पाणी येणार असल्याने मोटारी काढण्यासाठी गेले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदीकिनारी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार या शेतकऱ्यांना दिसले. यावेळी एका महिलेने स्वतःची नेसलेली साडी सोडून तरुणाच्या दिशेने फेकली व त्यामुळे अमोल व प्रदीप या दोघांचा जीव वाचला. मात्र संतोष प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
त्यानंतर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले. अमोल व प्रदिप हेही पाण्यामध्ये गुदमरले होते; परंतु छाती दाबून उलटे करून पोटातून पाणी काढण्यात आले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तब्येत बरी असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले; मात्र सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नाही.
यामध्ये कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य विभाग व फायर ब्रिगेडचे प्रमुख सुनील आरण, यांच्या नेतृत्त्वाखाली जवान सागर काटे, धनंजय शिनगर, प्रशांत शिंदे, आकाश नरोडे, घनश्याम कुन्हे व संजय विधाते हे पथकामध्ये असून तहसीलदार संदिपकुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मंडळाधिकारी नानासाहेब जावळे, तलाठी दिपाली विधाते, तलाठी दिनकर कातकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध घेण्यासाठी परिश्रम घेत असून अद्यापही शोधकार्य सुरू आहे. अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत असून शोधकार्य चालू आहे.
कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कुठे कमी नसल्याचे मुर्तीमंत उदाहरण आज दिसले. या महिलेने आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणांना पाण्याच्या बाहेर काढून जीवदान दिले. असे तहसीलदार संदिपकुमार भोसले यावेळी म्हणाले.