कोपरगाव

Shirdi News : शिर्डीत आणणार मदर डेअरी चा मोठा प्रकल्प !

Published by
Sushant Kulkarni

२१ जानेवारी २०२५ कोपरगाव : “केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष सहकाराचा खरा उद्देश आहे.दूध उत्पादक व सभासद हे खरे दूध संघाचे मालक आहेत.दूध संघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे.उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील,” असे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामांच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल बागडे यांच्या हस्ते काल सोमवारी झाला.त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा. रमेश बोरनारे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. काशिनाथ दाते, आ. अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कृष्णराव परजणे, काकासाहेब कोयटे, विजयराव वहाडणे, मच्छिद्र टेके, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे कार्यकारी अधिकारी हत्तेकर, उपविभागीय अधिकारी मानिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल बागडे म्हणाले, चांगल्या भावनेने सहकार क्षेत्रात काम केल्यास संस्थांना तोटा होत नाही, तोटा झाला तरी त्याची भरपाई अधिक क्षमता वापरून करता येते. देशात सहकार क्षेत्रातील विविध उद्योग मागील ६० वर्षांपासून यशस्वीपणे चालू आहे. दूध उत्पादक व वितरकांनी दूध भेसळ होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.

दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याने तो टिकला पाहिजे.दूध उत्पादनात भारतदेश जगात प्रथम क्रमांकावर आहे, असे त्यांनी सांगितले.प्रारंभी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते १.५ मेगावॅट (डी.सी.) क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, दूध शुद्धीकरण मशीन, सतत खवा बनविणारी मशीन,पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि पाणी साठवण टँक या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते संवत्सर ग्रामपंचायतीच्या घरकुल प्रकल्पांसाठी शेती महामंडळाच्या जागेचा उतारा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे राजश्री पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर विवेक परजणे यांनी आभार मानले.

शिर्डीत मदर डेअरी प्रकल्प आणणार मंत्री विखे

राज्यात सर्वाधिक ५३ लाख लिटर दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे.त्यामुळे शिर्डी औद्योगिक वसाहतीत मदर डेअरीचा प्रकल्प सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.तसेच एखादी संस्था सहकारात ५० वर्ष पूर्ण करत आहे.ही घटना सहकाराबद्दल लोकांचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni