अहमदनगर उत्तर

महाविकास आघाडी सरकार हे फक्त वसुली सरकार : माजी आमदार वैभव पिचड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  महावितरण कंपनीच्या अकोल्यातील कार्यालयावर गुरुवारी भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून पाच तास ठिय्या आंदोलन केले.

महावितरणकडून शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने वीजबिल आकारणी करून वीज वसुली करण्यात येत आहे. पूर्वसूचनेशिवाय वीज खंडित करून वेठीस धरत आहेत.

यामुळे उभी पिके पाण्याअभावी जळून खाक होत आहेत. म्हणूनच या सरकाराचा तीव्र निषेध व्यक्त करून जाग आणण्यासाठी शुक्रवारी अकोले तालुका बंद करण्यात येत आहे, अशी माहीती भाजप नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अॅड वसंतराव मनकर, अताएचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सुधाकर देशमुख, रावसाहेब वाळुंज, गोरक्ष मालुंजकर, राहुल देशमुख, शांताराम संगारे आदी उपस्थित होते.

यावेळी वैभव पिचड यांनी महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टीत कोणतीही मदत करण्यात आली नसल्याचा उल्लेख करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याऐवजी वाऱ्यावर सोडून देण्यात येत आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होत आहे.

शेतपिकांना पाणी रात्री भरतानाच अनेकांवर बिबट्याने हल्ले करून जखमी व मृतही केले. पण या सरकारच्या वनविभागाकडून कसलीही नुकसान भरपाई देण्यात येत नाही.

सत्तेवरील महाविकास आघाडी सरकार हे फक्त वसुली सरकार असून शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून असेलनसेल ते सर्व काढून घेत आहे, असाही आरोप वैभव पिचड यांच्याकडून करण्यात आला. शेवटी रिपाइंचे नेते चंद्रकांत सरोदे यांनी आभार मानले.

Ahmednagarlive24 Office