अहमदनगर उत्तर

आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असून महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे.

काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची १६ सप्टेंबर २०२१ रोजी निवड करून विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांची निवड केली होती.

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व विश्वस्त मंडळाने यांनी तदर्थ समितीचे अध्यक्ष, प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांच्याकडून पदभार घेतला आहे.

तेव्हापासून आ.आशुतोष काळे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री साईबाबा संस्थानचा कार्यभार पाहत आहे. आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा संस्थानचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे.

त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने समाधान व्यक्त केले आहे. श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. परंतु आ.आशुतोष काळे यांना आजपर्यंत राज्यमंत्रीपदाचा दर्जा अधिकृतपणे देण्यात आलेला नव्हता.

त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने अधिसूचना जाहीर करून श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असलेल्या आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे.

त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले असून मिळालेल्या राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून शिर्डी संस्थानचा उत्कर्ष व मतदार संघाचा विकास साधणार असल्याचे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office