अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- गोदावरीकिनारी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील कार्तिक स्वामीच्या यात्रेत मोर पिसांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलढाल झाली.
आग्रा, राजस्थान, अहमदाबाद आदी भागातील आदिवासी मंडळी ही पिसे वर्षभर गोळा करतात, तेथून होलसेल दराने येथील व्यापारी खरेदी करून पुणतांबा व देवगड येथे दरवर्षी त्याची विक्री करतात.
हिंदू धर्मात मोराच्या पंखाला मोठं विशेष महत्व आहे. भगवान कृष्णाच्या मुकुटावर मोर पंखाला प्रमुख स्थान आहे. विना मोरपंख भगवान कृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते.
त्याशिवाय भगवान शिवांचे पुत्र कार्तिकेय स्वामी, देवी सरस्वती आणि इंद्रदेव यांचं वाहनही मोर आहे. इतकंच नाही पुराणकाळात तर अनेक ग्रंथांची निर्मिती मोर पंखाने लिहिण्यात झाली आहे.
वास्तू शास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात मोर पंखाच्या महत्त्वाबाबत सांगण्यात आलं आहे. अनेक लोक मोरपंखाचा वापर घराला सजवण्यासाठी करतात.
मोर पंख दिसायला अत्यंत सुंदर असतात त्यामुळे या यात्रेत मोरपीस मोठ्या प्रमाणात विकले जातात. कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.
परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने भक्तांची गर्दी कमीच आहे. दोन वर्षानंतर ही यात्रा भरल्याने काही प्रमाणात यात्रेकरूंना दिलासा मिळाला.