महावितरणचा भोंगळ कारभार… संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील तळेगाव वीज उपकेंद्रात गलथान कारभार सुरू असून शेतीसाठी नियमित वीजपुरवठा केला जात नाही व पदाधिकार्‍यांना देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप करत येथील संतप्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी या वीज उपकेंद्राला टाळे ठोकले आहे.

दरम्यान तळेगाव दिघे येथे गेल्या दोन – तीन महिन्यांपासून शेतीसाठी अवघा 4 तास वीजपुरवठा केला जात असून तोही वीज सुरळीत होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यातच तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणचे विद्युत खांब शिफ्ट करण्याची मागणी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी तळेगाव विद्युत उपकेंद्राच्या अधिकार्‍यांकडे केली होती.

मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर सरपंचांसह पदधिकारी व ग्रामस्थांनी तळेगाव वीज उपकेंद्रास टाळे ठोकले.

त्यानंतर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील विद्युत खांब शिफ्ट करण्यासाठी वीज उपकेंद्रा अंतर्गतच्या कर्मचार्‍यांनी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले होते.

तसेच शेतीचा वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत असलेले नवीन कामाच्या ठिकाणचे विद्युत खांब शिफ्ट केल्याशिवाय वीज उपकेंद्राचे टाळे उघडले जाणार नाही, असा निर्धार सरपंच बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, इंजि. सुभाषराव सांगळे यांनी व्यक्त केला.