अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. करोनामुळे पती गमावल्यानंतर निराधार झालेल्या तालुक्यातील उंबरगाव येथील कविता अशोक परभणे या महिलेस डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील मिशन वात्सल्य तालुका समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे व बाळासाहेब जपे यांनी करोना एकल महिलांच्या अडचणी, प्रश्न समजावून घेण्यासाठी कविता परभणे यांच्या घरी भेट दिली.
तेव्हा त्यांचे पती अशोक परभणे यांच्या नावाने पंचायत समितीमार्फत चार वर्षांपूर्वी घरकुल मंजूर झाले होते. त्यानुसार घर बांधण्यासाठी 15 हजार रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला होता.
घर बांधायला खडी, वाळूही येऊन पडले होते. परंतु एका तक्रारीमुळे बांधकाम व अनुदान दोन्ही थांबविण्यात आले. तक्रारीची शहानिशा न करताच बांधकाम थांबविण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आले.
साळवे यांनी याबाबतची माहिती पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांना देत परभणे यांचे घरकुल पुन्हा मिळवून देण्याची विनंती केली. त्यांनाही परिस्थिती समजावून सांगत तात्काळ घरकुलाचे थांबलेले बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिले.