अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरात १५ डिसेंबर रोजी नायझेरियावरून आलेल्या ६ वर्षीय मुलगा व ४१ वर्षीय आईचा तपासणी अहवाल कोरोना बाधित आले. त्याचे नमुने ओमायक्रोन तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहेत.(Ahmednagar corona)
४१ वर्षीय महिला आपल्या सहा वर्षीय मुलासोबत नायझेरियावरून आली होती. राज्य आरोग्य विभागाकडून श्रीरामपूर तालुका आरोग्य विभागाकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (१८ डिसेंबर) श्रीरामपूर तालुका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय टीमने त्यांची कोरोना चाचणी केली.
त्यात आई आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल प्राप्त होताच. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्या टॅक्सीमधून ते आले होते त्या चालकासह त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्वांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दरम्यान, याबाबत तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजश्री देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, या दोघांचे नमुने ओमायक्रोन तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले आहेत.
त्याचा अहवाल येत्या चारपाच दिवसात प्राप्त होईल. जोपर्यंत या माय लेकांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांना खासगी रुग्णालयातच विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.