Newasa News : डबक्यात साचलेले पाणी पिऊन विषबाधा झाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Newasa News : नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे डबक्यात साचलेले पाणी पिऊन विषबाधा झाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. तेजस घुले यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सलाबतपूर येथे मृत शेळ्याचे मालक लक्ष्मण इंगळे हे नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी सलाबतपूर-प्रवरासंगम रस्त्याच्या लगत गेले होते. शेळ्या चारत असताना दुपारी उन्हाची काहिली वाढली.

त्यामुळे शेळ्या पाण्याचा ठाव घेऊ लागल्या. रस्त्याच्या लगतच शेतात उसाला पाणीही सुरु होते. मात्र विज गेल्याने पाईपलाईनचे पाणी बंद होते. तर शेजारी पाण्याचे डबके साचलेले होते.

त्यात शेळ्यांच्या कळपातील आठ शेळ्या पाणी पिल्या. त्यानंतर शेळ्यांना त्रास होऊन काही वेळातच आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे इंगळे यांच्या लक्षात आले.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते पाणी रासायनिक खत मिश्रीत असल्यानेच शेळ्यांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला. आठ शेळ्यांच्या मृत्युने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेळीपालन व्यावसाय हाच त्यांचा उपजिविकेचा मुख्य स्त्रोत असून यावरच कुटुंबांची उपजिविका व मुलांचे शिक्षणही सुरु असल्याचे समजते. घटनेची माहिती समजताच सरपंच अझर शेख, भाजपाचे उपसचिव दिलीप नगरे

माजी ग्रामपंचायत सदस्य अश्पाक शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस घुले, सलाबतपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर, डॉ. डौले, डॉ. नाईक, डॉ. गायके, डॉ. संदिप नांगरे, डॉ. नागरगोजे यांनी पाहणी करून पंचनामा केला.