अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- अकोले नगरपंचायतीची चार जागांसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. दि. 21 डिसेंबर 2021 रोजी अकोले नगरपंचायतच्या 17 पैकी 13 प्रभागातील निवडणुकीचे मतदान झाले.
यावेळी राहिलेल्या चार जागा ओ.बी.सी आरक्षित होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या चार जागाचे ओ.बी.सी आरक्षण रद्द होऊन सर्वसाधारण मधून निवडणूक आज दि. 18 जानेवारी रोजी होत आहे.
निवडणुकीनंतर दुसर्याच दिवशी म्हणजे दि. 19 जानेवारी रोजी तहसील कार्यालय अकोले येथे मतमोजणी होणार आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप-रिपाई युती, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सिताराम पाटील गायकर,
शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी -शिवसेना आघाडी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष यांच्यात तीन प्रभागात चुरशीची तिरंगी लढत होत आहे तर प्रभाग 4 मध्ये अपक्ष उमेदवारामुळे चौरंगी लढत होत आहे.
दरम्यान करोना संसर्ग झाल्यामुळे माजी आमदार वैभवराव पिचड काही दिवस प्रचारा पासून अलिप्त होते. मात्र करोनावर मात करून दोन दिवसांपूर्वी ते पुन्हा प्रचारात सहभागी झाले. त्यांच्या अनुपस्थितीत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनीही काही प्रचार सभा घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सिताराम पाटील गायकर, ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी, अशोक देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या.
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव नेहे, आरिफ तांबोळींवर प्रचाराची धुरा होती.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. नगरपंचायत मध्ये आमचीच सत्ता येईल असा दावा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केला आहे तर आ. डॉ. लहामटे यांनी सर्वच जागांवर आघाडी विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.