अहमदनगर उत्तर

Shirdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्‍वपूर्ण ठरणार ! १ लाख नागरीक सभेला उपस्थित राहण्‍याची शक्‍यता

Published by
Ahmednagarlive24 Office

Shirdi News : उत्‍तर नगर जिल्‍ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे पाणी ५० वर्षांनंतर कालव्‍यांव्‍दारे लाभक्षेत्रातील गावांमध्‍ये प्रत्‍यक्षात पोहोचल्‍याचा आनंद व्‍दिगुणीत करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्‍वपूर्ण ठरणार असून,

या दौ-याच्‍या निमित्‍ताने शिर्डी तसेच नगर येथील विविध प्रकल्‍पांचे लोकार्पण गुरुवार दिनांक २६ ऑक्‍टोंबर रोजी दुपारी २ वा होत असून, या ऐतिहासिक शेतकरी मेळाव्‍यात राज्‍य सरकारच्‍या वतीने नमो किसान सन्‍मान योजनेच्‍या अंमलबजावणीची सुरुवात प्रधानमंत्र्यांच्‍या उपस्थितीत होणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी काकडी विमानतळा शेतकरी भव्‍य प्रागंणात मागिल आठ दिवसापासून सुरु असून, सुमारे १ लाख नागरीक सभेला उपस्थित राहण्‍याची शक्‍यता लक्षात घेवून या सभेचे परिपुर्ण नियोजन करण्‍यात आले आहे.

यासर्व कार्यक्रमांना महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल रमेश बैस, मुख्‍यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री ना.अजीत पवार यांच्‍यासह केंद्र आणि राज्‍य मंत्रीमंडळातील मंत्री, खासदार, आमदार मोठ्या संख्‍येने उपस्थित राहणार आहेत.

महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली या सभेची तयारी करण्‍यात आली असून, आज त्‍यांनी पुन्‍हा सभास्‍थळी जावून या तयारीचा आढावा घेतला. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्‍त राधाकृष्‍ण गमे,

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक बी.जी शेखर पाटील, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालीमठ यांच्‍यासह वरि‍ष्‍ठ आधिका-यांनी संपूर्ण तयारीच्‍या नियोजनाची माहीती मंत्र्यांना दिली.

उन्‍हाच्‍या पार्श्‍वभूमीवर सभास्‍थळी तीन मोठे सभामंडप उभारण्‍यात आले असून, शेवटच्‍या माणसालाही सभा पाहाता यावी यासाठी प्रत्‍येक सभामंडपात वीस स्‍क्रीनची उभारणी करण्‍यात आली आहे. सुरक्षेच्‍या कारणामुळे सभामंडपातच उपस्थितांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍थाही करण्‍यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्‍यानंतर श्री.साई मंदिरात जावून ते दर्शन घेवून, विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था समितीने उभारलेल्‍या दर्शन रांगेचे उद्घाटन करतील. त्‍यानंतर पंतप्रधानांसह सर्व उपस्थित मान्‍यवर निळवंडे येथे धरणाचे लोकार्पण करुन जलपुजन करणार आहेत.

या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांचे दुपारी तीन वाजता व्‍यासपीठावर आगमने होईल. नगर येथील आयुष रुग्‍णालयाचे उद्घाटन आणि महिला व बाल रुग्‍णालयाचे भूमिपुजन दुरदृष्‍यप्रणालीतून करणार आहेत. तसेच उत्‍तर महाराष्‍ट्रातील रेल्‍वे प्रकल्‍पाच्‍या कामाची सुरुवातही मोदींच्‍या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने आयोजित केलेल्‍या शेतकरी मेळाव्‍यात राज्‍य सरकारच्‍या वतीने सुरु करण्‍यात आलेल्‍या नमो किसान सन्‍मान योजनेचा प्रारंभ करण्‍यात येणार असून, या योजनेतील पहिला हप्‍ता शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग केला जाणार आहे.

जिल्‍ह्यातील विविध योजनांच्‍या लाभार्थ्‍यांना प्रातिनिधीक स्‍वरुपात योजनांच्‍या लाभाचे वितरण प्रधानमंत्र्यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार असून, यामध्‍ये प्रामुख्‍याने आयुष्‍यमान भारत तसेच स्‍वामीत्‍व योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचा सर्वाधिक समावेश असणार आहे.

गेली अनेक वर्षे उत्‍तर नगर जिल्‍ह्यातील जीरायती भागाकरीता निळवंडे धरणाची व्‍हावी यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची आग्रही भूमिका होती. यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकारकडे पाठपुरावाही झाला. परंतू अनेक वर्षे तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले गेले.

परंतू समस्‍या लक्षात न घेता केवळ राजकीय व्‍देषापोटी निळवंडे प्रश्‍नावरून केवळ विखे कुटूंबियांना बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न झाला. परंतू राज्‍यात युतीचे सरकार आल्‍यानंतर या कामाला गती मिळाली. ५ हजार १७७ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्‍यताही मिळाली.

सर्वांच्‍या प्रयत्‍नाने आज हा प्रकल्‍प आज पुर्ण होत आहे. या प्रकल्‍पाच्‍या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदीजींची उपस्थिती ही आनंदाची बाब आहेच, आदरणीय खासदार साहेबांचे स्‍वप्‍न पुर्ण होत असल्‍याचे समाधान आहे.

Ahmednagarlive24 Office