पं. स. कार्यालयात वरिष्ठांचा त्रास, कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी हे आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन छळ करीत असल्याचा आरोप करीत कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षक अजितानंद पावसे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

याबाबत अजितानंद पावसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व गटविकास अधिकारी व पंचायत समिती सदस्य यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ४ एप्रिल २०२० रोजी पंचायत समिती श्रीरामपूर येथे रुजू झालो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ऑक्टॉबर २०२० मध्ये आपल्याला गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून कामकाज आदेश देण्यात आला. सर्व कामकाजाची स्वीकृती दर्शवत मध्यंतरीच्या कालखंडात इतर अनुभवी विस्तार अधिकारी संबंधित जबाबदार अधिकारी यांना चार्ज अथवा आदेश न देता केवळ आपल्याला आदेश केले जातात.

पंचायत समिती श्रीरामपूरमधील वरिष्ठ अधिकारी वैयक्तिक त्रास देण्या हेतू आपल्याला आदेश करतात. सातत्याने वैयक्तिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत १५ दिवसांत निर्णय होत नाही, तोपर्यंत रजेवर जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी अन्यथा २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा परिषद अहमदनगर मुख्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले.