अहमदनगर उत्तर

साईबाबा संस्थानचा अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने स्वीकारला पदभार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील, खा.सुप्रियाताई सुळे यांनी विश्वस्त मंडळावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू.

साईभक्त, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन साई भक्तांचे मंडळ म्हणून संस्थानचा कारभार करणार असल्याचे साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाची महाराष्ट्र शासनाने १६ सप्टेंबर २०२१ रोजी पात्रताधारक १२ सदस्यांची नावे जाहीर करून अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.आशुतोष काळे यांची निवड केली होती. परंतु राज्य शासनाकडून संपूर्ण विश्वस्त मंडळाची नेमणूक न केल्यामुळे नूतन अध्यक्ष व विश्वस्तांना संस्थानचा पदभार स्विकारण्यापासून मनाई करण्यात आली होती.

त्या आदेशाच्या विरोधात नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्याबाबत मंगळवार (दि.३०) रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कार्यभार करण्यापासून मज्जाव करण्याचा आदेश रद्द करून पदभार स्वीकारण्याची परवानगी दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवार (दि.३) रोजी नूतन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व विश्वस्त यांनी तदर्थ समितीचे अध्यक्ष, प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांच्याकडून पदभार स्वीकारला.

यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करतांना अध्यक्ष आ.आशुतोष काळे बोलत होते याप्रसंगी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, नूतन उपाध्यक्ष जगदीश सावंत, नूतन विश्वस्त सुरेश वाबळे, डॉ.एकनाथ गोंदकर,

श्रीमती अनुराधा आदिक, सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, राहुल कनाल, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके आदी उपस्थित होते. अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की,साई भक्तांच्या अडचणी, रुग्णालयांचे प्रश्न, कर्मचारी व ग्रामस्थांच्या समस्या संस्थानच्या माध्यमातून सामोपचाराने सोडविण्याचा विश्वस्त मंडळ सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.

ऑनलाईन दर्शनामुळे साई भक्तांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन ऑफलाईन दर्शन पास सुरु करावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती. त्या मागणीला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ऑफलाईन दर्शन पास सुरु करण्यास परवानगी दिली असल्यामुळे साई भक्तांची अडचण दूर झाली आहे.

अनेक साई भक्तांची भोजनालय सुरु करण्याची मागणी लक्षात घेऊन भोजनालय देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात सुरु केले आहे. यापुढे देखील साई भक्तांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्या-त्यावेळी तातडीने उपाययोजना करण्यास विश्वस्त मंडळ नक्कीच तत्परतेने निर्णय घेईल अशी ग्वाही अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली.

तसेच शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांना अपेक्षित असलेल्या सुखसोयी उपलब्ध करून देऊन पारदर्शक कारभार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ,

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कोपरगाव, शिर्डी व राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office