Ahilyanagar News: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता सभेचे आयोजन केलेले होते. या सभेचे अध्यक्षस्थानी वसंतराव देशमुख होते व वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले व दगडफेक तसेच जाळपोळ देखील झाली.
परिसरातील महिला एकत्र येत त्यांनी सभाच उधळून लावल्याची घटना धांदरफळ खुर्द बाजारतळ या ठिकाणी घडून आली. यावेळी बोलताना वसंतराव देशमुख यांनी महिलांचा अत्यंत अपमानजनक असा उल्लेख करून समस्त महिला भगिनींचा अपमान केला आहे. सभेमध्ये पूर्ण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते व ही सगळी बातमी ऐकताच या परिसरातील महिला एकत्र आल्या व त्यांनी सभास्थळी धाव घेतली.
यामध्ये सुजय विखे देखील राजकीय सुडभावनेने अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप यावेळी जमलेल्या महिलांनी केला. सभेमध्ये झालेल्या या गोंधळामुळे सुजय विखे यांनी त्यांचे भाषण आटोपते घेतले व वसंतराव देशमुख यांना देखील भाषण संपवण्यास सांगितले.
परंतु सभा संपवून ते निघत असताना त्यांना महिलांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकरणांमध्ये सभा उधळण्यात आली व संतप्त लोकांनी एक गाडी देखील फोडल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना जयश्री थोरात यांनी म्हटले की वसंत देशमुख यांना शिक्षाही व्हायलाच हवी.
जर मुलींबद्दल अशा भाषेत बोलले जात असेल तर मुलींनी राजकारणात का यावे असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
यामध्ये वसंतराव देशमुख फरार झाले आहेत व त्यांच्यावर आता कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. तसेच त्यांनी सुजय विखे यांचा देखील समाचार घेतला व याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, सुजय विखेंकडून देखील माझ्यावर पातळी सोडून टीका करण्यात आली.
तसेच रात्री दहा ते सकाळपर्यंत मला पोलीस स्टेशनमध्ये उभे राहावे लागत असेल तर पोलिसांवर किती दबाव होता आणि कुणाचा होता हे देखील लक्षात घेणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
वयाला शोभते का?
पुढे बोलताना जयश्री थोरात यांनी म्हटले की, जी घटना काल घडली ती कुणालाही न शोभणारी व अत्यंत वाईट अशी घटना असून जर महिलांनी राजकारणात यायचं असेल तर असं बोलल्यास कोण येणार?
मी असं काय केलं होतं की माझ्याबद्दल एवढे वाईट बोलले? जे बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारे आहे का? विरोधाला पण एक पातळी असते. नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं त्यांना शोभते का? असे अनेक प्रश्न त्यांनी या माध्यमातून उपस्थित केले.
चार गुन्हे दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि बहिणीने पूर्ण रात्र संगमनेर पोलीस ठाण्यासमोर बसून काढली. वसंतराव देशमुख यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याने निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संगमनेर मतदारसंघामध्ये तणावाचे वातावरण सध्या निर्माण झाले असून त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जयश्री थोरात यांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला असून रात्रभर त्या पोलीस स्टेशन बाहेर बसून होत्या.