संगमनेर

संगमनेरच्या स्वातंत्र्यांशी खेळाल तर उद्रेक होईल : थोरात

Published by
Sushant Kulkarni

३१ जानेवारी २०२५ संगमनेर : आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. त्यामुळे संगमनेरच्या स्वातंत्र्याची खेळाल तर याद राखा, असा इशारा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भरसभेत तहसीलदार यांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालेला अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्तावच जनतेला दाखविला.

आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ट होणाऱ्या गावांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री थोरात यांची काल गुरूवारी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रणजीत देशमुख, आर. बी. राहणे, लक्ष्मणराव कुटे यांच्यासह विविध गावांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी थोरात म्हणाले की, महसूल प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी असते. अप्पर तहसील निर्मितीला आमचा विरोध नाही, मात्र या तहसीलची निर्मिती करताना त्यामध्ये ज्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. ती गावे संगमनेर शहराच्या लगत आहे. संगमनेर खुर्द आणि बुद्रुक या दोन गावांना आजवर प्रवरामाई ने घट्ट पकडून ठेवले होते.

थोड्या अंतरावर असलेले संगमनेरचे तहसील कार्यालय सोडून संगमनेर खुर्दच्या नागरिकांना तब्बल २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वीला पाठवण्या मागचा प्रशासनाचा हेतू काय ? असे कितीतरी गावे आहेत.ज्यांचा आश्वी बुद्रुक अप्पर तहसीलमध्ये समावेश हा संशयास्पद आहे. नवीन अप्पर तहसील कार्यालय त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे, यातून संगमनेरची भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचना सुद्धा बिघडणार आहे.

असे असताना कोणत्याही गावाला विश्वासात न घेता असा अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव बनतोच कसा ? या पाठीमागे राजकीय डाव आहे, संगमनेरचे स्वातंत्र्य मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. एवढेच नाही तर शहराचे महत्व कमी करण्याची भूमिका देखील यामागे दिसते. तालुक्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असेही थोरात म्हणाले.

आश्वी बुद्रूक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्तावच नाही, असा प्रचार काहींकडून सुरू होता. त्याला उत्तर देताना भरसभेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तहसीलदारांच्या सहीचे २४ तारखेचे पत्रच यावेळी उपस्थितांना दाखविले. संगमनेरच्या मोडतोडीचा प्रस्ताव माझ्या राजकीय विरोधकांनाही पटणार नाही.राजकारणात कदाचित आमच्या भूमिका वेगवेगळ्या आपल्या तरीही या अन्यायाविरोधात संगमनेरकर एकत्रित लढा उभारतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा खोडसाळपणा आहे, तो वस्तुस्थितीला धरून नाही, ही बाब मी सरकार आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना पत्र देऊन जनभावना कळवणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Sushant Kulkarni