अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- राजापूर (ता. संगमनेर) येथील शिक्षकाची ऑनलाईन दोन लाख सहा हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
फसवणूक झालेल्या शिक्षकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर त्रिंबक सोनवणे (वय 43) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर एका व्यक्तीने फोन केला.
एसबीआय कस्टमर केअरमधून बोलतो, असे सांगितले. एसबीआयमधून बोलत असल्याने फिर्यादी यांनी त्याच्याशी बोलणे सुरू ठेवले. त्याने फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलमध्ये ‘एनीडेस्क’ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
यानंतर त्या व्यक्तीने फिर्यादीला योनो व योनोलाईट हे दोन अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगून त्यामध्ये एटीएम कार्डची माहिती भरण्यास सांगितली. त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे फिर्यादी करत होते.
यानंतर काही वेळाने फिर्यादीच्या बँक खात्यातून दोन लाख सहा हजार 81 रूपये कट झाले. फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी अहमदनगर सायबर सेलमध्ये फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहे.