१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.त्यावर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. खताळ यांना दिला.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात गेली ४० वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी आ. खताळ यांचा पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर असलेली अनेक विकासकामे सुरू झाली आहेत.
सुरू असणारी सर्व कामे चांगल्या दर्जाची व्हावीत, यासाठी आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.मात्र, प्रलंबित असणारी विकास कामे, शहराचे सुशोभीकरण, तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्ते, पाणीटंचाईसारखे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याचे सांगत आ. अमोल खताळ यांनी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन प्रलंबित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.प्रलंबित विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अमोल खताळ यांना दिला.