शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे,
कारण याआधीच विधानसभा निवडणुकीच्या काळात सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता मात्र ते पुन्हा अजित पवार गटात जाणार असून, शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनात (१८-१९ जानेवारी) त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सतीश चव्हाण यांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप ठेवून ६ वर्षांसाठी निलंबित केले होते. मात्र आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले की, “सतीश चव्हाण यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते.
परंतु त्यांनी १३ जानेवारी २०२५ रोजी शरद पवार गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करण्यात येत आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यावर सतीश चव्हाण हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप झाल्याने ते निलंबित झाले.
त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली, परंतु पराभव झाला. आता पुन्हा ते अजित पवार गटात सामील होत आहेत.
नुकतेच शिर्डीत भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हे पहिल्यांदाच मोठे अधिवेशन शिर्डीत होणार असल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडींवर उत्सुकता आहे.