शिर्डी

Shirdi News : साईमंदिरात दर्शनासाठी ग्रामस्थांना आधारकार्ड बंधनकारक

Published by
Ahmednagarlive24 Office

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आता शिर्डी ग्रामस्थांना मंदिरात प्रवेश करतानाच आधार ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना यापूर्वी समाधी मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी गावकरी गेटने सोडण्यात येत होते. तेव्हा ओळखपत्राची सक्ती नव्हती, मात्र गावकऱ्यांच्या नावाखाली बाहेरच्या मंडळींनी देखील ग्रामस्थ असल्याचा फायदा उठवत याच ठिकाणाहून दर्शनासाठी जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

त्याअनुषंगाने साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाने सर्वांचे ओळखपत्र तपासूनच आत सोडण्यात येत होते. मात्र यापुढे प्रत्येकवेळी ओळखपत्र दाखवूनच मंदिर परिसरात प्रवेश करावा लागणार आहे.

यामध्ये समाधी दर्शन, आरती अथवा मंदिर परिसरातील विविध मंदिरात दर्शनासाठी जाताना आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर साईसंस्थान प्रशासनाने तसे आदेश पारित केले आहे.

शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन रांगे व्यतिरिक्त विविध प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर प्रशासकीय कामानिमित्त आत येणाऱ्या कर्मचारी, शिडीं ग्रामस्थ व इतर प्रत्येक व्यक्तीचे ही ओळखपत्र तपासून व फिजिकल तपासणी करूनच आत सोडावे, असे आदेश सुरक्षा अधिकारी यांनी काढले आहे.

श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शनासाठी जगभरातून साईभक्तांसह व्हिव्हिआयपी, सिनेअभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती येत असतात. साईमंदिर परिसरात व दर्शनरांग परिसरात आठ प्रवेशद्वार आहे. साईभक्तांचे सुलभ दर्शनासाठी या प्रवेशद्वाराचा वापर केला जातो.

त्याअनुषंगाने साईसंस्थान प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेले कायम तसेच कंत्राटी सुरक्षा रक्षक यांना उच्च न्यायालयाच्या (दि.१०) नोव्हेंबर २०२३ च्या आदेशान्वये शिर्डी ग्रामस्थांना साईसमाधी दर्शन, आरती, मंदिर परिसरातील शनिमंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिर यांचे सुलभ दर्शन व्हावे, याकरिता आधारकार्ड (ओळखपत्र) तपासून व रजिस्टरला नाव नोंदणी करुनच गावकरी गेटने प्रवेश देण्यात यावा.

आधारकार्डसह फिजीकल तपासणी होणार

प्रवेशद्वार क्रमांक चार ने गावकरी यांना चारही आरतीचे वेळेस गुरुस्थान येथे परिक्रमेसाठी आधारकार्ड पाहून व फिजीकल तपासणी करुन सोडण्यात यावे. तसेच सर्वांना नम्रतेने व संयमतेने मार्गदर्शन करावे, असेही संरक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

त्यामुळे आता येथून पुढे शिर्डीतील सर्वसामान्य ग्रामस्थ व पुढारी यांना प्रत्येकवेळी कुठलेही कारण न देता आधारकार्ड दाखविणे सक्तीचे असून रजिस्टरला नावनोंदणी करूनच मग मंदिरात जावे लागणार आहे. साईबाबा संस्थानच्या या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते या शिर्डीकर यांस कशापध्दतीने प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office