अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar News :- शिर्डीत रंगपंचमीनिमित्त निघणारी रथत्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ मार्चला सायंकाळी शिर्डीत मोठ्या उत्साहात ही रथयात्रा निघणार आहे.
सोबतच दर गुरूवारी पालखीची पद्धतही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ यात्रा रद्द करण्यात आली होती.
यामुळे झालेली भक्तांची नाराजी साई संस्थाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटीवर रथयात्रेला परवानगी दिली आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
आता २२ मार्चला सायंकाळी ५ वाजता शिर्डीतून रथयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सहकार्य करणार असून पोलिसांचा वाढीव बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.
भाविकांनी कायदा सुव्यवस्था तसेच करोना नियमांचे पालन करुन या रथयात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.