शिर्डी

अपघात टाळण्यासाठी दिंड्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

शिर्डी येथून आळंदी येथे चाललेल्या महामंडलेश्वर काशिकानंद महाराज यांच्या दिंडीत संगमनेर तालुक्यात कंटेनर घुसून झालेल्या अपघातात ताराबाई गमे, भाऊसाहेब जपे, बबन थोरे, बाळासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचे निधन झाले होते.

अशा घटना टाळण्यासाठी दिंड्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी वारकऱ्यांसाठी आयोजित आदरांजली सभेत राहतेकरांनी केली.

राहाता शहरातील मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गावरून जाणाऱ्या दिंडीसाठी पोलीस प्रशासनाने आपल्या हद्दीतून एस्कॉर्ट द्यावा, दिंडीसाठी वेगळी व्यवस्था करावी, कारण पंढरपूर, देहू आणि आळंदी या देवस्थानाकडे पायी दिंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर जात असते.

यापूर्वीसुद्धा पायी जाणाऱ्या दिंड्यांचे मोठे अपघात होऊन वारकरी ठार झाले, तर काहीना कायमचे अपंगत्व आले. या अपघातात मृत पावलेल्या वारकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. वारकऱ्यांच्या दिंड्यांना अधिक वाहतुकीच्या रस्त्यावर पोलीस संरक्षण दिले जावे, अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या.

हनुमान चालिसा मंडळाचे सदस्य बंडूनाना वाबळे व हनुमान चालीसा सेवा मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे, मारुती बाबा भजनी मंडळाचे सुरेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या शोकसभेचे आयोजन केले होते.

गणेश कारखान्याचे माजी संचालक मोहनराव सदाफळ, भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन कापसे, माजी नगराध्यक्ष डॉ. के.वाय. गाडेकर, गणेशचे संचालक भगवान टिळेकर,

माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर, शशिकांत लोळगे, रयत सेवक शिक्षकेतर संघटनेचे नेते भागवत आरणे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महासंघाचे सुनील लोंढे, अॅड. भाऊसाहेब सदाफळ, पत्रकार रामकृष्ण लोंढे, चांगदेव पाडेकर, कीर्तनकार संतोष दीक्षित, दादासाहेब गायकवाड यांची यावेळी श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

Ahmednagarlive24 Office