श्री.साईबाबा आणि साईबाबा संस्थान यांच्याबद्दल अपमानजनक असे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रसारित होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून शिर्डीचे ग्रामस्थ असलेले कमलाकर कोते आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी काल म्हणजे शनिवारी जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन याबद्दलची तक्रार दाखल केली आहे.
काय म्हटले आहे फिर्यादीत?
श्री साईबाबा आणि साईबाबा संस्थान यांच्याबद्दल अपमानजनक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचा गंभीर आरोप शिर्डीचे ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी केला असून या विरोधात त्यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे फिर्याद दाखल केली आहे.
या संदर्भात शनिवारी कमलाकर कोते आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन यासंदर्भातली तक्रार दिलेली आहे. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, समाज माध्यमातील काही व्हिडिओमध्ये साईबाबा यांच्या बद्दल खोटी आणि अपमान जनक माहिती देण्यात आली असून यामध्ये साईबाबा यांचा जन्म आणि त्यांच्या जीवनाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत.
इतकेच नाही तर साई संस्थान बद्दल देखील निराधार आरोप करण्यात आलेले आहेत. तसेच व्हिडिओमध्ये साईबाबा हे विशिष्ट धर्माचे आहेत असे संबोधून अनेक बेछूट आरोप करण्यात आले आहेत.
त्यामुळे साईबाबा व संस्थानाचा अपप्रचार व बदनामी करणाऱ्या सर्व व्हिडिओंची सखोल चौकशी करावी व व्हिडिओमध्ये अशी माहिती देणाऱ्या व पसरवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी
व ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असले व्हिडिओ आहेत ते काढून टाकावे व साईबाबांविषयी असे निंदनीय पोस्ट करणाऱ्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. कमलाकर कोते यांनी व्हिडिओंचा आणि काही व्यक्तींचा नामोल्लेख देखील केलेला आहे.
तसेच साई संस्थांच्या अध्यक्षपदी सध्या न्यायाधीश असून सीईओ पदी आयएएस अधिकारी व सुरक्षा प्रमुखपदी पोलीस अधिकारी आहेत व यांनी देखील या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतली असून साई संस्थांनच्या माध्यमातून देखील या विरोधात फिर्याद दाखल होण्याची शक्यता आहे.
तसे पाहायला गेले तर चार महिने अगोदर कमलाकर कोते यांनी याबाबत तक्रार अर्ज दिला होता. परंतु त्या अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई मात्र करण्यात आलेली नाही.
यावेळी मात्र कोते यांनी रीतसर फिर्याद दाखल करून पोलिसांना पेन ड्राइवच्या माध्यमातून सदरचे व्हिडिओ सुद्धा दिले आहेत. आता या फिर्यादीनंतर या प्रकरणाची चौकशीची जबाबदारी सायबर क्राईमचे उपनिरीक्षक योगेश चायर यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.