Ahmednagar News : केंद्र व राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून कामगार, शेतकरी व श्रमिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे पाश्र्वभूमीवर मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, श्रमिक शेतकरी संघटना तसेच संयुक्त कामगार संघटना व
किसान मोर्चा यांच्या वतीने शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले, की देशात अनेक वर्षांपासून कामगार, शेतकरी व श्रमिकांच्या प्रश्नाकडे केंद्र व राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतकरी, कामगार व श्रमिकांना न्याय मिळत नसल्यामुळे २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय कामगार व किसान संघटनेने घेतला होता.
परंतु पोलिसांनी आंदोलनास व मोर्चास परवानगी नाकारल्याने राज्यातील संयुक्त कामगार कृती समिती व किसान मोर्चा यांनी या प्रश्नाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, प्रांत व तहसील कार्यालयात येथे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यासाठी २८ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मंगळवारी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार संघटना व किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी, कामगार श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत राज्यातील कंत्राटीकरण, किमान वेतन, कामगार कपात,
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, केंद्र सरकारने चार श्रम संहिता कायदे रद्द करावे, दुष्काळ, जमीन अधिग्रहण, पुनर्वसन वाढती महागाई व बेरोजगारी, शेतीमालाला हमीभाव, समन्यायी पाणी वाटप, दूध भाव वाढ, केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे, आदी प्रश्न गंभीर होत असताना सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे.
शेतकरी, कामगार श्रमिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शिर्डीत कामगार संघटना व किसान मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांनी विविध मागण्या मांडल्या. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सानप यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व श्रमिक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब सुरुडे, राजेंद्र बावके, जीवन सुरुडे,
शरद संसारे, मदिना शेख, राजेंद्र मुसमाडे, प्रकाश भांड, उत्तम माळी, अश्रू बड़े आदी पदाधिकाऱ्यांसह छाया आसणे, हसिना शेख, अन्नपूर्णा भारती, मनिषा बारगळ, सुनीता खिलारी, पुष्पा खिलारी, पूजा इनामके, मंदा सकाटे,
अरूण बर्डे, राहूल दाभाडे, हरूण शेख, भिमराज बनसोडे व संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.