अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- जगात सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे जगावर मोठे संकट ओढवले असतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकरणावर एक कविता सादर केली आहे.
रामदास आठवले म्हणाले, पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन, अशा शब्दांत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत यांनी चक्क कवितेतूनच प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्याच बरोबर नगर-कोपरगाव रस्त्यांवरील खड्ड्यांपासून ते युक्रेनवरील हल्ल्यापर्यंत लोकल ते ग्लोबल मुद्द्यांवर त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य केले.
मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या कविता व भाषणाच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाची शिर्डीत रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या प्रसंगी त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिघ्र कविता केली. दरम्यान आठवले म्हणाले, नगर-कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी साईसंस्थान व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा.
शिर्डीच्या विकासासाठी निधी द्यावा. मंत्री म्हणून नबाब मलिक चांगले मात्र त्यांचे जमिनीचे व्यवहार चांगले नाहीत. कुणी कुणाची जमीन बळकावणे चांगले नाही. एखाद्या मंत्र्याला ताब्यात घेऊन राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नाही.