जागतिक कीर्तीच्या शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्या व्हीव्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रोटोकॉल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी शिर्डीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश गोंदकर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. नागपूर येथे हिञाळी अधिवेशनादरम्यान रमेश गोंदकर यांच्यासह शिर्डी ग्रामस्थांनी शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी विशेष अतिथींच्या दर्शनासाठी शिर्डीत स्वतंत्र प्रोटेकॉल ऑफिसर नेमावा या मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी हे जागतिक किर्तीचे देवस्थान आहे, येथे मोठ्या संख्येने साईभक्त दर्शनासाठी येत असतात. सुट्टीच्या काळात व इतर वेळी राज्यासह परराज्यातील मंत्रीगण तसेच माननीय न्यायमूर्ती, सेलिब्रिटी, खेळाडू, अभिनेते यांच्यासह विविध मान्यवर व्हिव्हीआयपी साईभक्त मोठ्या प्रमाणात शिर्डीला येतात.
त्याप्रसंगी शिर्डी पोलीस स्टेशनचे तसेच शिर्डी वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह इतरही विभागांच्या कर्मचार्यांना व्हिव्हीआयपीचे प्रोटोकॉल व दर्शनासाठी वेळ द्यावा लागतो.
एकतर शिर्डी वाहतूक शाखेकडे पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. त्यात प्रोटोकॉलचा अधिक भार येतो, परिणामी पोलीस तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असताना सर्वसामान्य अथवा कामानिमित्त येणार्या व्यक्तींना वेळेवर ते भेटू शकत नाही.
शिर्डीत गर्दीच्या काळात नेहमीच वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. या त्रासाचा सामना साईभक्तांना करावा लागतो. अशा वेळी साईभक्त नाराजी व्यक्त करतात. शिर्डीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच शिर्डी ‘पोलीस स्टेशनसाठी स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे; मात्र या अधिकाऱ्यांचा व पोलिसांचा बराचसा वेळ व्हीआयपी प्रोटोकॉल ब दर्शनासाठी खर्च होतो.
त्यामुळे शिर्डीत वाढती गुन्हेगारी, ‘पाकीटमारी साईभक्तांच्या चैन ख्रॅचिंगचे प्रकार, वाहनातून मोबाईल पर्स चोरीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. हे टाळण्याकरिता पोलिसांकडून प्रोटोकॉलचे काम काढून घेणे गरजेचे आहे. याबाबी रोखण्याकरीता आपल्या पुढाकारातून साईदर्शनासाठी येणार्या विशेष अतिथीकरीता स्वतंत्र प्रोटोकॉल अधिकाऱ्यांची व यंत्रणेची नेमणूक करावी.
यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, शिर्डी ‘नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप, राष्ट्रवादीचे अमित शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश गोंदकर, शिर्डी माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते निलेश कोते, नितीन उत्तमराव कोते, उद्योजक दादाभाऊ गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, दत्तात्रय कोते, माजी नगरसेवक रवींद्र कोते, विकास गोंदकर, किरण कोते, किरण कोते, वैभव कोते, महेश गोंदकर, नंदू कोते व ग्रामस्थ उपस्थित होते.