Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक साईनगरी शिर्डीत दाखल होत असतात. श्री क्षेत्र तिरुपती बालाजीनंतर श्रीक्षेत्र साईनगरी शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे.
दरम्यान शिर्डी येथील साईबाबांच्या ऐतिहासिक मूर्तीसंदर्भात आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. खरेतर शिर्डीच्या ऐतिहासिक मंदिरात 1954 मध्ये साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. अर्थातच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होऊन आता जवळपास 7 दशकांचा काळ उलटला आहे.
साईबाबांची ही मूर्ती सजीव भासते. ही मूर्ती सजीव असल्याचा भास होतो. तुम्हीही कधीही शिर्डीच्या भव्य मंदिरात साईबाबांच्या दर्शनासाठी गेलात तर या मूर्तीचे निरीक्षण करा तुम्हाला नक्कीच ही मूर्ती सजीव असल्याचा भास होईल. मात्र या सजीव भासणाऱ्या मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे.
ही मूर्ती मुंबई येथील प्रसिद्ध शिल्पकार भाऊसाहेब उर्फ बाळाजी तालीम यांनी तयार केली आहे. ही मूर्ती इटालियन मार्बल मध्ये तयार करण्यात आली आहे. दरम्यान, इटालियन मार्बल मध्ये तयार झालेल्या या मूर्तीची आता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात झीज होत आहे. यामुळे जर या ऐतिहासिक मूर्तीची काळजी घेतली गेली नाही तर ही मूर्ती गुळगुळीत होण्याची भीती आहे.
मूर्तिकार तालीम यांनी मूर्तीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त ही भीती बोलून दाखवली होती. मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे माजी संचालक पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांनी देखील याबाबत वारंवार संस्थानला सूचना दिल्या आहेत.
दरम्यान संस्थानच्या माध्यमातून या मूर्तीची झीज कमी व्हावी यासाठी आता मूर्तीच्या स्नानासाठी अति गरम पाणी आणि दही दुधाचा वापर कमी करण्यात आला आहे. खरेतर गरम पाण्याचा आणि दही दुधाच्या आम्लाचा मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो यामुळे याचा वापर कमी करण्यात आला आहे.
दरम्यान काही मूर्ती तज्ञांनी या ऐतिहासिक मूर्तीची अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डेटा संरक्षित केला गेला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. याबाबत पुणे येथील कार्व टेक संस्थेचे संचालक प्रशांत बंगाळ व संतोष चव्हाण यांनी साई संस्थांनची इच्छा असल्यास आम्ही साईबाबाच्या सध्याच्या मूर्तीची अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डेटा मोफत संरक्षित करून देऊ असे म्हटले आहे.