पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील तो स्वतः आरोपी नव्हताच. खोट्या गुन्ह्यात पोलीसांनी त्यास पकडल्यानंतर आरोपी म्हणून न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडीसह दोन महिने न्यायालयीन कोठडीत जेलमधे काढावे लागले.
त्याने स्वतःची चूक नसताना देखील आरोपातून सुटण्यासाठी याचना केल्यानंतर फिर्यादीकडून प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी झाली.
या जाचाला कंटाळून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समाेर आली आहे.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुदर्शन चंद्रकांत राजगुरू (२२, सुगाव बुद्रूक, ता. अकाेले) असे या तरुणाचे नाव आहे. फिर्यादीस दोन लाख रुपये देऊन गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांकडे आर्थिक मदतीची मागणी केली.
पण कुटुंबाची आर्थिक कुवत नसल्याने ही रक्कम देणे शक्य झाले नाही. पण फिर्यादीकडून आरोपीस वारंवार धमक्या देत, शारीरिक व मानसिक त्रास देत पैशाची मागणी सुरूच राहीली.
मात्र दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडीसह सुमारे दोन महिन्यांचा कालावधी जेलमध्ये काढावा लागला. याचा परिणाम अर्थातच काम करत असलेल्या औद्योगिक कंपनीने त्यास सेवेतून निलंबित केले.
त्याला नोकरीवरून काढून टाकल्यावर तो आणखीनच खचला. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याने आपले जीवनच संपविण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी (८ डिसेंबर) आपण आत्महत्या करत असून त्यास माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांनाच जबाबदार धरून त्यांना कडक शिक्षा व्हावी. जेणेकरून पुन्हा कोणी असे आरोप करून खोटे गुन्हे कोणी दाखल करणार नाहीत,
अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. शेजारील लोकांकडून प्रयत्न करूनही वेळेत सुदर्शनला वाचविणे शक्य झाले नाही. अकोले पोलिसांकडून या आत्महत्येबाबद अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली