अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- अपघातातील मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा अपघात केल्याचे भासवून बनावट कागदपत्रे केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
यामध्ये नेवासा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस नाईक महेश कचे याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मुरलीधर संभाजी क्षीरसागर याचा २३ डिसेंबर २०१९ रोजी नेवासा शेवगाव रोडवरील भानसाहिवरा परिसरात अपघात झाला होता.
याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा पोलीस नाईक कचे याने तपास केला होता. तपासात अपघातातील वाहनाचा क्रमांक नमूद न करता बनावट वाहन दाखविण्यात आले.
व इतर खोटी बनावट कागदपत्रे तयार केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस उपाधीक्षक रविकिरण दरवडे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सदर गुन्ह्याचा तपासी अधिकारी तथा नेवासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक महेश हरिश्चंद्र कचे, बाळासाहेब संभाजी क्षीरसागर, बाळकृष्ण वाल्मिक आव्हाड, भारत वाल्मिक आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.