३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागल्याने मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या सभासदांनीही आता त्यात उडी घेतली आहे. संस्थेची निवडणूक घेण्यासंदर्भात एकूण अहवाल संस्थेचे प्रशासक रावसाहेब खेडकर यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे पाठवला आहे.
दरम्यान, पुरी हे दुसऱ्या तातडीच्या कामासाठी मुंबईला रवाना झाल्यामुळे यासंदर्भातला फैसला होऊ शकला नाही. संस्थेची निवडणूक घेण्यासाठी लागणारी रक्कम भरण्यासाठी मुळा-प्रवरा वीज संस्थेने हात वर केल्यामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये असंतोष धगधगत आहे.
संस्थेची निवडणूक व्हावी, अशी जाहीर मागणी संस्थेच्या जागरूक सभासदांनी केल्याने या संस्थेची निवडणूक आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणते रूप धारण करते. याकडे सभासद कामगारांचे लक्ष लागले आहे. प्रशासक रावसाहेब खेडेकर यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांना भ्रमणध्वनी आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचे कात्रण थेट पॅक्स केले आहे.
भाड्यापोटी मिळालेले कोट्यावधी रुपये संस्थेत पडून आहेत. निवडणूक प्राधीकरणाने यापूर्वीच संस्थेला संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काही रक्कम भरण्यासाठीचे निर्देश दिले होते. मात्र, निवडणुकीसाठी रक्कम भरण्याबाबत प्राधिकरणाने मार्गदर्शन करावे, पत्रव्यवहार करीत असा संस्थेने आजपर्यंत निवडणूक घेण्यासाठी चालढकल केली आहे.
संस्थेची निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचे सक्त आदेश आहेत. त्यामुळे या संस्थेची निवडणूक होणे अपरिहार्य आहे. येत्या एक-दोन दिवसात जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची यासंदर्भात आपण समक्ष भेट घेणार आहोत. १ लाख ७५ हजार सभासद असलेल्या मालकांचा मुळा-प्रवरा वीज संस्था हा संसार आहे. सरकारने त्याची नोंद घ्यावी.
लवकरात लवकर या निवडणुकीबाबत निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र थोरात यांनी दिला आहे.