अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- सरकारच्या शेतीविषयक आडमुठ्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची गरज असताना देखील रात्रीच्या वेळीच केला जात आहे.
यामुळेच एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात रात्रीच्या सुमारास विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा पाईप फिरवताना तोल गेल्याने विहीरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला.
माणिक भास्कर मुठे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात विहीरीवर वीजपंप सुरू करण्यापूर्वी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माणिक मुठे व रविंद्र मुठे गेले होते.
लाईट येण्यास पाच-दहा मिनिटांचा अवधी असल्याने पाईप खालील केबल वर घेण्यासाठी विहिरीच्या कठड्यावरील पाईप व केबल ओढताना तोल जाऊन माणिक पाण्याने तुडुंब भरलेल्या विहीरीत पडला.
पाण्याचा आवाज ऐकून रविंद्रने विहीरीकडे धाव घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने रविंद्रने मदतीसाठी आरडाओरडा केला. बाजुचे लोक मदतीला येईपर्यंत माणिक पाण्यात बुडाला होता.
स्थानिक तरुणांनी मुठे यांना बाहेर काढुन तातडीने येथील कामगार रुग्णालयात दाखल केले. असता उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.