अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील मुळा प्रवरा या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू तस्कर या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.(Theft)
तालुक्यात आता मुरूम तस्करीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील निमज परिसरात खुलेआम मुरुमाचा उपसा होत आहे. या ठिकाणाहून वर्षभरात तब्बल 50 कोटी रुपयांच्या मुरुमाची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मुरूम चोरीबाबत अनेकदा तक्रारी होऊनही महसूल प्रशासनाकडून मात्र संबंधित मुरूम तस्करांविरुद्ध कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक ठिकाणी मुरुमाची चोरी होत आहे. तालुक्यातील निमज गावात गेल्या वर्षापासून प्रचंड प्रमाणात मुरूम उपसला जात आहे. याठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्याने मुरूम उपसा केला जातो.
जेसीबी मशीन, हायवा मशीन व अनेक कर्मचारी या ठिकाणी मुरूम उपसण्याचे काम करताना आढळतात. स्थानिक ग्रामस्थांनी या मुरूम उपसा बाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.
सामाजिक वनीकरण खात्याच्या जागेतूनही मुरुमाची तस्करी केली जात आहे. वनखात्याचे कर्मचारी याबाबत लक्ष देत नाही. वर्षभरात संबंधित इसमाने तब्बल 50 कोटी रुपयांचा मुरूम उचलल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकार्यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधित मुरूम उपसा करणार्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.