अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगावमध्ये कापड दुकान फोडून चोरीची घटना समोर आली आहे.
अज्ञात चोरट्याने शिव कलेक्शन हे कपड्याचे दुकान फोडून कपड्यांची चोरी केली. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, किरण गागरे यांचे घारगाव येथे शिव कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. रविवारी नेहमीप्रमाणे गागरे हे दुकान बंद करून घरी निघून गेले होते.
सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील माल चोरून पोबारा केला.
दुसर्या दिवशी सोमवारी (29 नोव्हेंबर) दुकानाचे संचालक गागरे यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले .
त्यांनी तातडीने या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने घारगाव येथे एक चोरी झाली होती.
आताही पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांसह व्यापार्यांतून जोर धरु लागली आहे.