अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. या महामारीमुळे अनेक गोष्टी कार्यपद्धतीत बदल झाले आहे. आता याचाच भाग म्हणून कोरोना महामारीमुळे नगरपंचायतच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांची निवड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी येत्या 7 डिसेंबरला होणार्या विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीची वेळ आल्यास, प्रत्येक सदस्याने खोलीत एकटे बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदान करायचे आहे. मावळत्या नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे.
विशेष सभेच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना कळविले आहे. त्यानुसार पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गोविंद शिंदे काम पाहतील. कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रत्येक सदस्य त्याच्या खोलीत एकटाच असल्याची खात्री पिठासीन अधिकारी करणार आहेत.
त्यासाठी सदस्यांनी आपल्यासमोरील कॅमेरा 360 अंशात फिरवून दाखवायचा आहे. कॅमेरा आणि सदस्यांतील अंतर सहा फूट ठेवावे. त्यात आवश्यक तो बदल केला तरी चालेल; मात्र हे अंतर अधिक ठेवून सदस्य ओळखता येणार नाही, अशी स्थिती नसावी. सभेचे व्हिडीओ रेकॉर्डींग होत असल्याची खात्री पिठासीन अधिकाऱ्यांनी करावी, आदी सूचना केल्या आहेत.