अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहाता शहरातून जाणार्या अवजड वाहनांमुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीमुळे दुचाकीस्वार व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
यातच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येतात. बाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी राहाता शहरातून जाणार्या महामार्गावरून जातात. परिणामी अवजड वाहनांमुळे राहाता शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते.
शहरात नियमितपणे होणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी 24 कि. मी निर्मळपिंपरी बाह्यवळण रस्ता मंजूर आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाह्यवळण रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
बाह्यवळण रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक शिर्डी राहाता शहरातून जाणार्या नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावरून सुरू करण्यात आली.
अवजड वाहनांमुळे नगर-मनमाड मार्गावर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बोजा असल्याने पावसाचेे पाणी साचून रोड खचून जात आहे. परिणामी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे होत आहे.
दरम्यान निघोज ते निर्मळ पिंपरी बाह्यवळण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून नगर-मनमाड राज्यमहामार्ग वरून जाणारी अवजड वाहतूक तात्काळ बाह्यवळण रस्त्यावरून सुरू करण्यात यावी अशी मागणी राहाता परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी दंड वसूल करण्यात मग्न… राहाता शहरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. या ठिकाणी राहाता वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी कधीच उपस्थित नसतात.
शिर्डी -शिंगणापूर तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांना दंड करण्याऐवजी त्यांच्याकड सोयीस्कर दुर्लक्ष करून शहरातून जाणार्या दुचाकी वाहनांना करोना नियम दाखवीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात मग्न असतात.