अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- निवडणूक म्हंटले कि कार्यकर्ते, उमदेवार यांना खुश करण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली जातात. पैशाच्या जोरावर तर कोठे आमिष दाखवून निवडणूक जिंकण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ सुरु असते.
यातच अकोलेमधून दारूमुक्त निवडणूक घेण्यात याव्या ही मागणी जोर धरू लागली आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त होतील. यासाठी गावातील जाणत्या माणसांनी, महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दारूबंदी आंदोलनाने केले आहे.
निवडणुका आठवड्यात संपून जातील पण व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील, हे व्यसनी तरुण तुमच्या माझ्या घरातीलच असणार आहेत. आज फुकट दारू पिणाऱ्यांना उद्या स्वखर्चाने दारू प्यावी लागणार आहे. याचे भान ठेवून त्यामुळे दोन्हीही पॅनलने व गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ठेवून दारू वाटणाऱ्या,
मुलांना हॉटेलमध्ये नेणाऱ्या उमेदवारांना समज द्यावी व गावातील मतदारांनी असे उमेदवार पराभूत करावेत असेही आवाहन केले आहे. अशा उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कराव्यात.
राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनीही दारू वाहतूक, वेळ संपल्यावर रात्री हॉटेल उघडी राहणे व अवैध दारूची विक्री याबाबत लक्ष ठेवावे व कारवाई करावी याबाबत आंदोलनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे.