अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. चोरी, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये देखील दहशत पसरली आहे. यातच पोलीस यंत्रणा यामध्ये कुचकामी ठरू लागली आहे.
नुकतेच तालुक्यातील सलाबतपूर परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सलाबतपूर शिरसगांव गळनिंब आदी गावांमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.
शिरसगाव व सलाबतपूरमध्ये अनेक व्यापार्यांची दुकाने फोडून मालासह रोख रकमा चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर घरफोडीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
अनेक चोर्यांचे गुन्हे दाखल असताना एकाही गुन्ह्याची अद्याप उकल झालेली नाही हे विशेष आहे. तालुक्यात अनेक छोट्यामोठ्या चोर्या झाल्या मात्र पोलिसांचा तपास शून्यच दिसून येतो.
शिरसगावातही एकाच रात्री तीन ते चार ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली. त्याचाही तपास लागणे बाकी आहे. केवळ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे चोरांचे धाडस वाढले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
चोरीच्या वाढत्या सत्रामुळे वाडीवस्तीवरील नागरीक दहशतीखाली असून जनावरे व इतर मालमत्तांचे राखण करण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याने व्यापारीवर्गही धास्तावला आहे . तालुक्यात सध्या सुरु असलेल्या चोर्यांचे सत्र थांबवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून झालेल्या चोर्यांचा तपास लावून जनतेची विश्वार्हता टिकवण्याचे मोठे काम पोलिसांना करावे लागणार आहे.