अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर एका कालवडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे.
वनखात्याने तेथे पिंजरा लावावा, अशी मागणी असताना पिंजरा लावला जात नाही. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील माधव पवार वस्ती व परिसरात वारंवार बिबट्या व त्याचे बछड्याचे वास्तव्य दिसत असून अनेकदा लोकप्रतिनिधी व वनखात्याचे अधिकारी कर्मचारी यांना कळविले तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
विशेष बाब म्हणजे या भागात वर्ष-दोन वर्षांपासून बिबट्याची दहशत आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी शेतात जायला घाबरतात, कामगारांना कामावर जाण्यास भीती वाटते, वनखात्याच्या कर्मचारी यांना कळविले तरी गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.
एखाद्या माणसाचा जीव गेल्यावर वनखात्याला जाग येईल का? असा संतप्त सवाल करून हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्याला निलंबित करावे, अशी मागणी होत आहे.