Ahmednagar News : नगर येथील मोहरम राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सणासाठी अनेक भागातून नागरिक नगरच्या मोहरमसाठी आवर्जून उपस्थित असतात. याच मोहरमच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात १६ जुलै व १७ जुलै रोजी कत्तलची रात्र व सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे.
शहरात मागील काही महिन्यांत तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दक्षतेचा भाग म्हणून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. नगर शहर व भिंगार परिसरातील तब्बल ४६९ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दोन दिवस तडीपार करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.

नगर शहरात मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, तणाव निर्माण होईल, अशा घटना घडलेल्या आहेत. त्यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत.
या घटनांसंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशातही प्रश्न उपस्थित झाला होता. आता १६ जुलै व १७ जुलै रोजी मोहरमनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार असून त्यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून नगर शहर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत.
नगर शहर विभागातील कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ४६९ जणांना १६ व १७ जुलै अशा दोन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे. भारतीय नागरी संरक्षण कायदा कलम १६२ (२) अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे उपअधीक्षक भारती यांनी सांगितले.
दरम्यान, हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार हद्दपार कालावधीत शहरात आढळून येतात. अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. हद्दपार कालावधीत नगर शहरात आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही यापूर्वी झाला आहे.
अशा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या व त्या व्हायरल करणाऱ्यावरही सायबर पोलिसांचे लक्ष असणार आहे. नगर शहर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १००, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८० व भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८९ अशा तब्बल ४६९ जणांना १६ व १७ जुलै अशा दोन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे.