अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण धडक ! पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी, आ. आशुतोष काळे…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News: कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर एका चारचाकी गाडीने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार पोकॉ. गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरूवारी दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान घडली.

अपघात घडल्याच्या वेळेला त्या ठिकाणावरून आमदार आशुतोष काळे जात असताना त्यांनी जखमीला आपल्या गाडीतून दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरुण पाराजी सुपेकर (रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) हे पोलीस कॉन्स्टेबल नेमणूक

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातून आपले घराकडून कोपरगावकडे दुचाकीवर जात असताना पाठीमागून येणारे कृष्णराव छगन बैरागी (रा. बारागाव, पिंप्री, ता. सिन्नर) यांनी आपल्या एमएच १५ ईबी ४५३७ क्रमांकाच्या मारुती अल्टो चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. व चारचाकी गाडी बाजूच्या खाली जाऊन उभी राहिली.

सुदैवाने चारचाकी चालक बैरागी यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. जखमीला त्या ठिकाणचे रहिवासी शेतकरी अशोक पवार, दादासाहेब गायकवाड, सचिन नवले, नितीन नवले, सद्‌गुरु कृपा पेट्रोलियमचे मालक संतोष जाधव, विक्रम पवार, मच्छिद्र गायकवाड, रावसाहेब गायकवाड, महेश गायकवाड आदींनी मदत केली.

दरम्यान, अपघात घडल्याच्या वेळेला त्या ठिकाणावरून आमदार आशुतोष काळे जात असताना त्यांनी जखमीला आपल्या गाडीतून दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे जखमीला वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाल्याचे त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी सांगितले. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे,

पोलीस नाईक साळुंके, गृहरक्षक दलाचे अंकुश आहेर हे त्या ठिकाणी ताबडतोब उपस्थित झाल्यामुळे रहदारीचा अडथळा वेळीच दूर करण्यात आला. व नालीत पडलेली चारचाकी गाडी काढण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत होते. सिन्नर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० व बाजूस असणाऱ्या पालखी मार्गाचे काम अर्धवट राहिल्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा नेमके अंदाज येत नाही.

तसेच रस्त्याच्या मधोमध असलेले दुभाजक अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या तोडून टाकल्यामुळे मधून वाहनधारक रस्ता ओलांडतात. त्यामुळे देखील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक गावांमध्ये महामार्गाच्या कडेला बसवलेले पथदिवे तसेच रस्त्याच्या मधोमध बसवलेले हायमास्ट अनेक दिवसापासून बंद असल्याचे तेथील स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवले आहे. मात्र याकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाविषयी नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

Ahmednagarlive24 Office