अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख व त्यांचे चिरंजिव उदयन गडाख यांच्या खुनाचा कट रचल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
त्याचा पोलिस तपास करीत आहेत. मात्र, तेव्हापासून गडाख यांच्या पोलिस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी एका आंदोलनाच्या खटल्याचे समन्स बजावण्यासाठी पोलिस थेट गडाख यांच्या बंगल्यात शिरले होते.
त्यावेळी यावरून मोठ गदारोळ उडाला होता. आजही गडाखभोंवती पोलिसांचे कडे आहे, पण ते त्यांच्या सुरक्षेसाठी. नेवासा तालुक्यात टोकाचे राजकारण सुरू आहे.
भाजप विरूद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या काही काळापासून येथे पहायला मिळत आहे. तालुक्यातील बहुतांश घटनांना या संघर्षाचे संदर्भ जोडले जातात.
मंत्री गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला. त्यातील दोन आरोपींना अटकही झाली. दरम्यानच्या काळात ही ऑडिओ क्लीप समोर आली आहे.
याच दरम्यान, हा हल्ला माझ्या पीए वर नव्हे तर माझ्यावरच होता, अशी प्रतिक्रिया गडाख यांनी व्यक्त केली. या प्रकरणी आज नेवासा तालुक्यात कडकडीत बंदही पाळण्यात येत आहे.
ऑडिओ क्लीप समोर आल्यानंतर पोलिसांनीही दक्षता म्हणून गडाखांचे पोलिस संरक्षण वाढविले आहे. मंत्री म्हणून त्यांच्यासोबत असलेल्या नेहमीच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
राज्यात भाजपची सत्ता असताना गडाख यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे आंदोलन केले होते या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
त्याचे समन्स बजावण्यासाठी मोठा फौजफाटा घेऊन पोलिस गडाख यांच्या नगर येथील बंगल्यात आले होते. त्यावरून राजकीय आरोप झाले होते. मधल्या काळात राजकारण बदलले.
गडाख पुन्हा निवडून आले, मंत्रीही झाले. आता हेच पोलिस गडाख यांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत. याची तालुक्यात चर्चा आहे.