अहमदनगर बातम्या

उबाठा शिवसेनेला राजीनामा देताच बबनराव घोलप यांचे राजकीय भवितव्य धोक्यात… कारण काय ?

Published by
Tejas B Shelar

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यामुळे सध्या राजकीय माहोल पूर्णपणे तापलेला आहे. विविध राजकीय घडामोडी राज्याच्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. राज्यातील काही नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोडीशी वेगळी भूमिका देखील घेतली आहे. यामध्ये बबनराव घोलप यांचा देखील समावेश होतो.

बबनराव घोलप यांनी उबाठा शिवसेना पक्षाला नुकताच जय महाराष्ट्र केला आहे. उबाठा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपला पुढील राजकीय प्रवास सुरू केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिवसेनेकडून मंत्रीपद भूषवलेले बबनराव घोलप हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.

यामुळे त्यांनी उबाठा शिवसेना पक्षाला राम-राम ठोकला असून लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात समाविष्ट होणार अशा चर्चा रंगत आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकते असा देखील दावा केला जात आहे.

अशातच मात्र घोलप यांची अडचण वाढली आहे. खरंतर बबनराव घोलप यांना जिल्हा सत्र न्यायालयाने एका प्रकरणात दोषी सिद्ध करत त्यांना शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. यामुळे ते आगामी लोकसभा लढवण्यासाठी सध्या अपात्र ठरत आहेत.

पण, त्यांनी या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केली आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. अजून बबनराव घोलप यांच्या अपिलावर अंतिम निर्णय झालेला नाही.

दरम्यान या प्रकरणात आज देखील मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र, उच्च न्यायालयात आजच्या सुनावणीसाठीच्या खटल्यांची संख्या खूपच अधिक होती. आजच्या सुनावणीमध्ये बबनराव घोलप यांच्या खटल्याचा क्रम २६ वा होता.

यामुळे आज घोलप यांच्या खटल्यावर सुनावणी होऊ शकली नाही. यामुळे या सुनावणीसाठी आता नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे. माननीय न्यायालयाने यावर 28 मार्चला सुनावणी घेऊ असे म्हटले आहे.

एकंदरीत घोलप यांनी केलेल्या अपील याचिकेवर आजही अंतिम निर्णय झालेला नसल्याने ते लोकसभा निवडणूकीसाठी पात्र राहणार की अपात्र ? यासाठी पुढील सुनावणी पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

वास्तविक, लोकसभा निवडणुकांसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होणार अशी शक्यता आहे. दरम्यान बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे राहणार असे चित्र आहे.

यामुळे घोलप यांच्या राजकीय भवितव्यासाठी 28 मार्च ही तारीख खूपच महत्वाची ठरणार आहे. या दिवशी जर या खटल्यावर माननीय न्यायालयाने अंतिम निकाल दिला बबनराव घोलप निवडणूक लढवण्यास पात्र राहणार की अपात्र हे समजणार आहे. यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळाचे या खटल्याकडे विशेष लक्ष लागून राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com