Ahmednagar Politics : लोकसभेतील यशानंतर आता महाविकास आघाडी पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकत्रित लढल्यास नक्कीच फायदा अहोईल परंतु जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिनसणार का?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील सात जागा आपल्याला मिळाव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे किमान सात जागा काँग्रेसला घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. आ. थोरात यांना दिलेल्या पत्रात वाघ म्हणतात, की नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. यामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे.
जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी शिवसेना आणि नगर राष्ट्रवादीकडे जागा गेल्या. आता विधानसभेच्या १२ जागा आहेत. यापैकी काँग्रेसकडे संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. मात्र आगामी निवडणुकीत आपल्याला आणखी किमान चार जागा मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले.
काँग्रेस ‘या’ जागा मागतेय?
सध्या काँग्रेसकडे संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. मात्र आगामी निवडणुकीत आपल्याला श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगाव व अकोले या जागा मिळाव्यात, अशी मागणी वाघ यांनी आमदार थोरात यांच्याकडे केली आहे.
मात्र, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोले या चारही जागांवर यापूर्वीच शरद पवार उद्धव ठाकरे गटाने चाचपणी सुरू केलेली आहे.
महायुतीमध्येही वाद?
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला त्यात जिल्हाध्यक्ष नाहटा यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला नगर शहरासह कर्जत-जामखेड, राहुरी, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर अकोला व श्रीगोंदा या जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाचा संघर्ष सुरू झाल्याचे दिसले.