Ahmednagar Politics : आगामी विधानसभेच्या अनुशंघाने सध्या सर्वच मतदार संघात सध्या अनेकांनी तयारी सुरु केलीये. पाथर्डीमध्ये सध्या ऍड.प्रताप ढाकणे, आ.राजळे, चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे आदी इच्छुक आहेत.
दरम्यान सध्या जर वातावरण पाहिले तर ढाकणे व घुले यांनी जनसामान्यांच्या अगदी दारात जात संवाद सुरु केलाय. ढाकणेंची शिवार फेरी तर घुलेंची जनपरिसंवाद यात्रा जोरात सुरु आहे. दरम्यान इतर इच्छुक अद्याप या दोघांच्या तुलनेत शांतच असल्याचे दिसते.

ऍड.प्रताप ढाकणेंची शिवार फेरी
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे हे आपल्या शिवारफेरीतून विधानसभेची साखर पेरणी करत आहेत. गावाला भेट देऊन त्या गावात अॅड. ढाकणेंचा मुक्काम सध्या होत आहे.
थेट बांधावरच भेटी घेत ते चर्चा करत आहेत. त्यांनी नुकतेच बोधेगाव परिसरात शेतात जाऊन शिवार फेरी सुरू केली आहे. या फेरीत शेतकऱ्यांची व शेतमजुरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची साखर पेरणी सुरु केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अॅड. ढाकणे यांनी खासदार नीलेश लंके यांच्या खांद्याला खांदा देऊन शेवगाव व पाथर्डी तालुका पिंजून काढत लंकेंना मताधिक्य देण्यासाठी ताकत पणाला लावली होती. सध्या सत्तेत असलेल्या महायुतीच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन या सरकारने राज्याचा काय खेळखंडोबा चालविला ?
त्यांचे निर्णय शेतकऱ्यांच्या कसे विरोधातले आहेत? हे पटवून देण्यावर त्यांचा भर आहे. यापूर्वी अॅड. ढाकणे यांनी जनसंवाद यात्रा काढून सभांच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी आता शिवारफेरीचे आयोजन केले आहे.
घुले बंधूंची जनपरिसंवाद यात्रा
सध्या घुले बंधू जनपरिसंवाद यात्रा काढत असून यामध्ये विविध प्रश्नांवर जोर देत आहेत. तसेच आपला हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा, पक्ष चिन्ह यापेक्षा माणूस पहा असा सूर सध्या त्यांचा आहे.