Ahmednagar Politics : लोकसभा संपताच सुरु झाली नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी. निवडणूक जाहीर होताच अनके राजकीय गुंते समोर येऊ लागले व राजकीय संघर्ष कसा असेल याचेही चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले. ही निवडणूक शिक्षक केंद्रित न राहता राजकीय धुरंधरांच्या भोवती गुरफटत राहील अशी शक्यता निर्माण झाली.
त्यात भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ते भाजपकडून उभे राहतील की आणखी काही प्लॅनिंग करतील याकडे नजरा लागलेल्या होत्या कारण डॉ. राजेंद्र विखे यांनी देखील आमदारकीसाठी इच्छा व्यक्त केली होती. आता यावर पडदा पडला असून विवेक कोल्हे यांनी आज (दि.३१ मे) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
भाजपशी बंडखोरी की आणखी काही ?
दरम्यान आता विवेक कोल्हे यांनी अपक्ष फॉर्म भरून भाजपशी बंडखोरी केली अशी चर्चा रंगू लागली. ते सत्यजित तांबे यांनी वापरलेला पॅटर्न वापरणार का अशी चर्चा होऊ लागली. अपक्ष उभे राहत सर्वच पक्षांचा पाठिंबा घ्यायचा असे काही त्यांच्या मनात असावे का? अशी देखील चर्चा रंगू लागली आहे.
कोल्हे म्हणतात..
दरम्यान या सर्व घडामोडीनंतर आज विवेक कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी सांगितले की, मी काही बंडखोरी केलेली नाही. जेथे मला निवडणूक लढायची आहे तो मतदारसंघ शिक्षकांशी निगडित आहे.
त्यामुळे येथे राजकीय दृष्टिकोनातून पाहताच येणार नाही. शिक्षकांचे प्रश्न सुटणे येथे महत्वाचे असून सर्वच पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत असे ते म्हणाले. पक्ष विरहित उमेदवारी करावी असा शिक्षकांचा आग्रह असल्याने मी अपक्ष लढण्याचे ठरवले आहे. तसेच अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.