Ahmednagar Politics : विधानसभेला वेळ तरी आ.पवार-आ.शिंदे कार्यकर्त्यांमध्ये ‘जुंपली’, मुद्दे तेच पण फायदा कुणाला? पहा..

pawar shinde

Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या दोन आमदार आहेत. आ. रोहित पवार तर दुसरे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे. आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. परंतु त्याआधीच आ.पवार-आ.शिंदे कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर रंगला आहे.

पुन्हा एकदा टंचाई, पाणी टँकर आणि रस्त्याच्या कामाच्या निधीवरून आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय संघर्ष पहावयास मिळत आहे. मतदारसंघाची जनता अवकाळी पावसाच्या नुकसानीने आणि गावागावातील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पाणीटंचाईने त्रस्त असताना दोन्ही आमदारांचे समर्थक पुन्हा एकदा श्रेयवादाची राळ ‘सोशल मीडिया’वर उडविताना दिसत आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा पाणीटंचाईची चांगलीच झळ सर्वांना बसली आहे. प्रशासनाकडून यावर उपाययोजना सुरू असताना ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होऊ नये यासाठी आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक संस्थेकडून काही टँकर मदतीला आले.

यासह खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांनीही आपल्या यंत्रणेकडून मागणीनुसार गावांना पाण्याचे टैंकर पोहचविले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्याच नेत्यांनी टंचाई काळात लाभार्थी गावांना दिलासा देत त्यांची तहान भागविली, अशा आशयाच्या पोस्ट टाकत राजकीय जिरवा जिरवी सुरू केली.

एकमेकांच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीदेखील झाडल्या. पाणीटंचाईवरून दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते शांत होत नाहीत तोपर्यंत पुन्हा एकदा अहमदनगर करमाळा बायपास रस्त्यावरील गावांच्या अंतर्गत रस्त्यासाठी २२ कोटी रुपयांच्या निधी मंजुरीवर आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडिया विभागाकडून त्यांच्या पत्रासह पोस्ट टाकण्यात आली.

त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आक्षेप नोंदवत आमदार पवार भुलभुलैया करीत असल्याच्या पोस्टचा धुराळा उडाला. सध्या दोन्ही तालुक्यातील जनता पाणीटंचाई आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीने त्रस्त आहे. पवार आणि शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियाच्या या श्रेयवादात जनता मात्र नाहक भरडली जात आहे हे मात्र नक्की. या दोघांच्या श्रेयवादाचा फटका मतदारसंघातील विकासकामांना बसू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करताना दिसतात.

पाणी टँकरवरही आरोप-प्रत्यारोप..
रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी पाणीटंचाई काळात दोन्ही तालुक्यातील कर्जत-जामखेड एकात्मिक संस्थेकडून पुरविण्यात आलेल्या टँकरसह त्याच्या खेपा आणि त्यांच्या लाभार्थीच्या संख्येचा लेखा-जोखा सोशल मीडियावर मांडला.

यास भाजप कार्यकर्त्यांनी हरकत घेत लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असलेल्या पोस्ट टाकत खासदार विखे आणि आमदार शिंदे यांच्या यंत्रणेकडूनही टँकर सुरू असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिले. यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रशासकीय यंत्रणेद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे विशद केले.